। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये झालेली वेतनकपात आणि औषधोपचार, स्वच्छता आणि इतर बाबींसाठी खर्च वाढल्याने राज्यातील सुमारे 36 टक्के कुटुंबांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. राज्य सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून ही बाब पुढे आली आहे.
राज्य सरकारने राज्यातील 16 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करून हा निष्कर्ष काढला आहे. लॉकडाउन काळात बंद असलेली मजुरी, शेतमालाला नसलेला उठाव, अनेकांची झालेली वेतनकपात, ठप्प पडलेले उद्योग आदींमुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले. त्यातच कोरोना काळात औषधोपचार, स्वच्छता, वीजबिल तसेच इतर कारणांसाठी घरखर्चात मोठी वाढ झाली होती. दरम्यानच्या काळात तर अनेकांचे रोजगारही गेले होते. त्यामुळे राज्यातील जवळपास 36 टक्के कुटुंबांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले. या सर्वेक्षणात ग्रामीण भागातील सहा हजार 200, तर शहरी भागातील नऊ हजार 800 कुटुंब सहभागी झाले होते.