मुंबई मॅरेथॉनमध्ये इथियोपियन धावपटूंचे वर्चस्व

पुरुष, महिला विभागात सहाही स्थानांवर बाजी

| मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबई मॅरेथॉनमध्ये इथियोपियन धावपटूंचेच वर्चस्व दिसून आले. एलिट पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांतील पहिल्या तीन स्थानांवर इथियोपियाच्याच खेळाडूंनी नाव कोरले. पुरुष विभागात हायले लेमी याने; तर महिला विभागात अबराश मिनसेवो हिने जेतेपदावर नाव कोरले.

पुरुष विभागात इथियोपियाच्या तीनही धावपटूंमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळाली. पहिल्या 20 किमी व त्यानंतर 30 किमीपर्यंतच्या प्रवासावर नजर टाकल्यास तीनही खेळाडूंमध्ये जास्त अंतर नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अखेरच्या टप्प्यात हायले लेमी याने बाजी मारली व पहिल्या स्थानावर झेप घेतली. हायले लेमी याने 2 तास, एक मिनीट व चार सेकंदात शर्यत पूर्ण केली. हायमनोत अल्यू याने 2 तास, एक मिनीट व 44 सेकंदात शर्यत पूर्ण करीत दुसरा क्रमांक पटकावला. मितकू ताफा याने 2 तास, दोन मिनिट व 33 सेकंदात शर्यत पूर्ण केली व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले.

महिला विभागात अबराश मिनसेवो हिने 2 तास अठरा मिनिटे व चार सेकंद अशा वेळेत शर्यत पूर्ण केली व अजिंक्यपदावर हक्क सांगितला. मुलुब्त सेगा हिने 2 तास अठरा मिनिटे व 34 सेकंदात शर्यत पूर्ण करताना दुसरा क्रमांक पटकावला. मेडिन बीएने हिने 2 तास, 19 मिनिटे व 31 सेकंदांसह शर्यत पूर्ण करताना तिसरे स्थान मिळवले. या तीनही खेळाडूंमध्ये 30 किमीपर्यंत अटीतटीची लढत रंगली हे विशेष.

पुरुष विभागातील विजेते
हायले लेमी (2 तास, एक मिनीट व चार सेकंद)
हायमनोत अल्यू (2 तास, एक मिनीट व 44 सेकंद)
मितकू ताफा (2 तास, दोन मिनिटे व 33 सेकंद)
महिला विभागातील विजेते
अबराश मिनसेवो (2 तास, अठरा मिनिटे व 4 सेकंद)
मुलुब्त सेगा (2 तास, अठरा मिनिटे व 34 सेकंद)
मेडिन बीएने (2 तास, 19 मिनिटे व 31 सेकंद)
दोन्ही विभागांत यश
मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा पुरुष व महिला या दोन्ही विभागांत इथियोपियाच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. महिला विभागात पहिल्या आठ क्रमांक इथियोपियाच्या खेळाडूंनी मिळवले. तसेच पुरुष विभागातील पहिल्या दहा क्रमांकांपैकी पाच स्थानांवर इथियोपियाच्या खेळाडूंनी प्रवेश केला. पुरुष विभागात आठव्या स्थानावर भारताच्या श्रीनू बुगाता याने बाजी मारली.
Exit mobile version