महिनाभरानंतरही कामाला मुहूर्त नाही

स्लॅब कोसळून आठ वाहने नाल्यात; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिक त्रस्त

| चणेरा | प्रतिनिधी |

रोहा शहरातील दमखाडी नाक्याजवळील जयराम अपार्टमेंट परिसरातील नाल्यावरील स्लॅब 30 जुलै रोजी रात्री अचानक कोसळून तब्बल आठ वाहने नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती. मात्र, दुर्घटनेला महिना उलटत आला तरी नाल्याच्या दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

घटना घडल्यानंतर रोहा नगराध्यक्षा वनश्री शेंडगे आणि मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. नगरसेवक रवी चाळके, महेंद्र गुजर, अजित मोरे, रोशन चाफेकर, अहमद दर्जी, संजना शिंदे, अरबाज मनीयार यांच्यासह नागरिकही यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, घटना घडली, पाहणी झाली, आश्वासने मिळाली; पण प्रत्यक्ष काम कुठे आहे? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वाहनचालकांसाठी हा परिसर डोकेदुखी ठरत असून, दमखाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर गाळे, दुकाने तसेच नागरिकांची वस्ती असल्याने नाल्याच्या दुरवस्थेचा थेट परिणाम स्थानिकांच्या दैनंदिन व्यवहारावर होत आहे. दुर्घटनेमुळे अनेक दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेवकांच्या भूमिकेबाबतही नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दुर्घटनेनंतर एवढा कालावधी उलटूनही नाल्याच्या दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने स्थानिक नागरिक आणि दुकानदारांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी, दुकानदारांचे नुकसान आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारी संभाव्य वाहतूक समस्या लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे कामासाठी ठोस पाठपुरावा करणे अपेक्षित होते, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र, ‘दोन-तीन दिवसांत काम सुरू होईल’ या आश्वासनानंतर प्रत्यक्षात कामाची सुरुवात नेमकी कधी होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात या परिसरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यातच काम सुरू झाल्यास किंवा सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर नाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असल्याने त्याची दुरुस्ती, सुरक्षितता आणि आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासने न देता तातडीने प्रत्यक्ष काम सुरू करून ते दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 30 जुलैच्या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र आता प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचा संयम सुटण्याची वेळ आली आहे. ‘काम सुरू होणार’ या आश्वासनापेक्षा ‘काम सुरू झाले’ हे पाहण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

नाल्याच्या कामासंदर्भात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर बैठक झाली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन ते तीन दिवसांत काम सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आहेत.

सुनील पवार
सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता
Exit mobile version