चार-चार महिने होऊनही बिलाचा पत्ता नाही

रोह्यातील दहा गावांना वीज बिलाची प्रतीक्षा
ग्राहकांच्या तक्रारीकडे महावितरणचे दुर्लक्ष
मुरुड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील 12 गावांना चार-चार महिने होऊन गेले तरी वीज बिल मिळत नसून, ग्राहकांना वीज बिल भरणे कठीण होत आहे. लॉकडाऊनमुळे बेरोजगारी असल्याने एकदम चार महिन्यांचे वीज बिल ग्राहकांना भरणे अवघड झाले आहे. याबाबत महावितरणकडे तक्रार केली असता, उडवाउडवीचे उत्तरे ग्राहकांना देण्यात येत आहेत.

रोहा तालुक्यातील कांटी, खडकी, वांदरखोंड, केळकर, वाघरपट्टी, फणसवाडी, गोपाळ वाट, टिटवी, म्हसाडी असे 10 ते 12 गावे दुर्गम डोंगराळ भागात वसलेले आहेत. या गावांना वारंवार वीज खंडित समस्येला सामोरे जावे लागत आहे. या गावातील वीज ग्राहक हे अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत. या वीजग्राहकांना सलग चार-चार महिने वीज बिल येत नाहीत. जरी चार महिन्याने वीज बिल आले तर ते महावितरण व्याजासकट पाठवते. या दुर्गम भागातील पहज ग्राहकांची अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्याने एकदम चार महिन्यांचे बिल भरणे अवघड होत आहे. त्यात कोरोनाचे संकट गेले दोन वर्षे रोजगार उपलब्ध नसल्याने आणखी हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

रोहा महावितरणचे अभियंता श्री. वाघमोडे यांच्याकडे सदर चार महिन्यांनी येणार्‍या वीज बिलाबाबत तक्रार केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असून, कोरोनासारख्या संकटामधे ग्राहकांना चार-चार महिने लाईट बिल न आल्याने एकदम कसे भरायचे, हा मोठा प्रश्‍न ग्राहकांना पडला आहे. लाईट बिल कमी करण्यासाठी ग्राहक गेले असता बिल कमी करून मिळत नसून, हप्त्यानेदेखील बिल भरण्याची मुभा ग्राहकांना मिळत नाही. रोहा महावितरण अभियंता वाघमोडे यांना विचारले असता, मी वीज बिल विषयावर काही करू शकत नाही. तुम्हाला वीज बिल भरावेच लागेल, असे उत्तर दिले. तरी ग्राहकांची होणारी गैरसोय व मनस्ताप याच्यातून त्यांना मुक्त करण्याची मागणी वीज ग्राहकांकडून होत आहे.

Exit mobile version