| मुंबई | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणूक आता तिसर्या टप्प्यात आलेली असताना प्रचार शिगेला पोचला आहे. एप्रिल मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात होणार्या सभांसाठी मातब्बर नेते फिरत आहेत. आहाराबाबत सजगता बाळगत नेते प्रचारसभा घेत आहेत. योग्य आहार, भरपूर पाणी पिणे आणि जमेल तेवढी झोप घेणे याची सांगड घालत नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचाराचा धडाका लावला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे एकेका दिवशी किमान चार सभा, मेळावे पत्रपरिषदा घेत आहेत. त्या त्या गावी मुक्काम करून सभेनंतर महत्त्वाच्या मंडळींच्या भेटीगाठी घेत आहेत.
राज्यभर प्रचार करत असतानाही मुख्यमंत्री शिंदे मध्येच मुंबई ठाण्याचा दौराही करतात. रात्री सभा घेतात व त्यानंतरही लोकांना भेटतात. या काळात ते थोडाफार आहार करतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसाला तीन ते पाच सभा घेतात.
सध्या ते केवळ एकवेळ जेवतात. न्याहारी भरपूर घेतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. सकाळी सात वाजता संपर्क दौरा सुरु होतो. बारामतीतून वर्धा ,अकोला अशा जागी सभा घेऊन परत येतात. या नेत्यांच्या दिमतीला विमाने, वाहने हजर आहेत. मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अतिश्रम आणि उन्हामुळे चक्कर आली. मात्र, त्यांनी काही वेळातच भाषण देऊन प्रचारातील उत्साह दाखवून दिला. चाळीसच्या आसपास तापमान असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.