अखेर सीएससी कंपनीचे प्रशासन झुकले

जाचक अट केली रद्द, रायगडातील संगणक परिचालकांना होणार फायदा
। म्हसळा । वार्ताहर ।
संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये काम करणार्‍या संगणक परिचालकांनी बुधवारी (दि.13) इन्व्हाईस क्लेमला लावण्यात आलेली अट रद्द करण्यात यावी या मागणीसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेवून रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भालेराव साहेब यांनी संघटनेच्या शिष्टमंडळा सोबत चर्चा करून संघटनेची भूमिका जाणून घेऊन जिल्हा व्यवस्थापक आणि प्रकल्प व्यवस्थापक यांच्या सोबत चर्चा केली नंतर इन्व्हाईस क्लेमला लावण्यात आलेली अट रद्द करण्याबाबत सीएससी कंपनी प्रशासनाला कळविले होते. त्यावर संघटनेकडून जो पर्यंत ती अट काढत नाहीत तोपर्यंत आम्ही जागेवरून उठणार नाही आणि कंपनीला जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो दुपारी 2 वाजेपर्यंत घ्यावा अशी ठाम भूमिका घेऊन आंदोलन सुरू ठेवले होते.
दरम्यान कंपनीकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने संघटनेचे राज्यसचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेऊन आता जर कंपनी काही निर्णय घेत नसेल तर या ठिकाणी चालू असलेल्या आंदोलनाला वेगळे वळण लागू शकते असा धमकी वजा सूचक इशारा दिल्या नंतर हालचालींना वेग येऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुन्हा एकदा संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलावून प्रोजेक्ट मॅनेजरकडून लेखी पत्र देत असल्याचे सांगितले आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे शब्दाचा मान ठेऊन ठिय्या आंदोलन मागे घेत असल्याचे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे यांनी घोषित केले. यावेळी ठिय्या आंदोलनात जिल्ह्यातील महाड, माणगाव, पोलादपूर, तळा, म्हसळा, रोहा, मुरुड, अलिबाग, पेण, कर्जत, उरण, सुधागड-पाली या तालुक्यातील संगणक परिचालक सहभागी झाले होते.

Exit mobile version