| धाटाव | वार्ताहर |
शेडसई ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालिका प्राजक्ता कडू यांना कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता कामावरून तडकाफडकी काढण्यात आले आहे. त्यांना पुन्हा कामावर घ्यावे,या मागणीसाठी दहा ऑगस्टपासून रोहा पंचायत समितीच्या कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा रोहा तालुका संगणक परिचालक संघटनेने दिला आहे.
शेडसई ग्रामपंचायत कार्यालयातील सदर कामाचा ठेका सीएससी एसपीव्ही या एजन्सी देण्यात आला आहे. असे असताना सबंधित एजन्सीने शासनाच्या सर्व नियमांची पायामल्ली करत संगणक परिचालिका कडू यांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आला आहे. या घटनेचा रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध केला आहे. त्याचप्रमाणे सर्व संगणक परिचालक सर्व प्रकारच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला असल्याचे अध्यक्षा सौ. वैभवी चौलकर यांनी दिला आहे. या विषयी तहसीलदार कविता जाधव, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे. यावेळी सदस्या प्राजक्ता कडू, ज्योत्स्ना मोरे, रुपाली धामाणसे, अश्विनी पोटफोडे, रुचिरा भोसले, रुपाली देशमुख इत्यादी सदस्य उपस्थिती होते.