हर घर झेंडा अभियानातून महिला बचत गटांना रोजगार

जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत हर घर झेंडा अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांना रोजगार मिळवून देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. जे बचतगट शिवणकाम क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी भारताचे झेंडे बनवावेत, हे झेंडे विक्रीसाठी ग्रामपंचायत हद्दीत विक्री स्टॉल व ठिकठिकाणी बचतगट महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गुरुवारी (ता.7) पंचायत समिती गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या बैठकीत केले.

जिल्हा परिषदेच्या सुरबा नाना टिपणीस सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी डॉ. किरण पाटील यांनी हर घर झेंडा अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. प्रत्येक गावात किती घरे आहेत, शासकीय इमारती किती आहेत. किती झेंडे लागतील याची माहिती संकलित करावी, अशा सूचना केल्या.

गावातील प्रत्येक घरात झेंडावंदन करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करून, नागरिकांना हर घर झेंडा अभियानाची माहिती द्यावी. तसेच या अभियानाच्या माध्यमातून महिला बचतगटांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी शिवणकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या बचतगटांकडून झेंडे तयार करून घ्यावेत ते झेंडे विक्रीसाठी ग्रामपंचायत हद्दीत विक्री स्टॉल व ठिकठिकाणी बचतगट महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन करावे अशा सूचना डॉ. किरण पाटील यांनी केल्या. तसेच कुणाकडूनही राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणार्‍या योजना तसेच सुरू असलेली कामे यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, पणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांचेसह सर्व विभागांचे अधिकारी, पंचायत समिती गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते.

हर घर झेंडा अभियानाची जनजागृती करताना हर घर झेंडा सोबत प्रत्येक व्यक्तीचे एक झाड याप्रमाणे जनजागृती करावी. 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावावे यादृष्टीने प्रयत्न करावेत. 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभेत नागरिकांना रोपे उपलब्ध करून द्यावीत.

– डॉ. किरण पाटील, सीईओ जि.प.



Exit mobile version