प्रत्येक संघाला वेळेत प्रवेश अर्ज देणे बंधनकारक-अ‍ॅड. आस्वाद पाटील

कुमार, प्रौढ व किशोर गट जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
। पेण । वार्ताहर ।
रायगड जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत प्रौढ गट, कुमार गट व किशोर गट या प्रत्येक गटातील कबड्डी संघाने दिलेल्या वेळेतच प्रवेश अर्ज देणे बंधनकारक आहे. काहीही झाले तरी प्रत्येक गटाचा प्रवेश अर्ज स्वीकारण्याच्या तारखेत बदल होणार नाही. याची प्रत्येक संघाने नोंद घ्यावी. याबाबत काही शंका असल्यास जे.जे. पाटील यांच्याशी 9822 427102 यांच्याशी संपर्क साधा, असे आवाहन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी केले.

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्न महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या विद्यमाने या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राजगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीच्या नव्या हंगामातील स्पर्धांबाबत नियोजन करण्यासाठी पेझारी येथे बैठक संपन्न झाली. यावेळी जे.जे. पाटील, नरेश मामा, गजानन मोकल, लक्ष्मण गावंड, हिराचंद पाटील, ज.ना. पाटील, उल्हास पाटील, प्रथमेश पाटील, हेमंत राऊळ आदी उपस्थित होते. नव्या हंगामातील कबड्डी स्पर्धांचे आयोजन, नियोजन, सामन्यासंदर्भात नियम व सूचना याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

कुमार गट मुले व मुली जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 19 व 20 नोव्हेंबर रोजी भालचंद्र स्पोटर्स, बोकरविडा-उरण येथे होणार आहेत. या स्पर्धेतील अर्ज व फी स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबरपर्यंत असेल.

प्रौढ गट पुरुष व महिला निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 26 ते 30 नोव्हेंबर रोजी निखिल मयेकर मित्र मंडळ नागाव-अलिबाग येथे होणार असून, प्रवेश अर्ज व फी स्वीकारण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबरपर्यंत राहील.

किशोर गट मुले व मुली निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 4 व 5 डिसेंबर 2022 रोजी साहिल इंटर प्राईजेस व ग्रामस्थ मंडळ कणे पेण येथे होणार आहेत. या स्पर्धेतील अर्ज व फी स्वीकारण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर राहील.

प्रवेश अर्ज पूर्ण भरून जनार्दन पाटील पेझारी 9270926436, गजानन मोकल कारावी 9673128344 व रमेश म्हात्रे पेण 9423091319 यांच्याकडे फीसहित जमा करावे. जे संघ प्रवेश अर्ज नियोजित वेळेत जमा करतील अशा संघांची नावे भाग्य पत्रिकेवर घेतले जातील. त्यानंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार केला जाणार नाही.

प्रौढ गट, कुमार गट व किशोर गटातील संघानी त्यांना दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज व फी भरावी. जे संघ प्रवेश अर्ज व फी नियोजित वेळेत जमा करतील, त्या संघांतच सामने खेळविले जातील. मग कमी संघ असले तरी भाग्य पत्रिका काढल्या जातील. त्यानंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार केला जाणार नाही.

Exit mobile version