प्रत्येकाने आवडीचे क्षेत्र निवडावे: न्या. जवळगेकर

| श्रीवर्धन | वार्ताहर |
प्रत्येकाने आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये करिअर करावे, दुसरा करतोय, म्हणून मीही तेच करेन, तर ते चुकीचे आहे. कायदा हा एवढा मोठा समुद्र आहे की काही तासांत त्याबद्दल सांगणे अवघड आहे. परंतु तुम्हाला कायद्याचं काहीतरी ज्ञान असावं आणि येणार्‍या अडचणींवर तुम्ही मात करु शकाल एवढाच कायद्याबद्दल सांगण्याचा हेतु आहे, असे उद्गार श्रीवर्धनच्या न्यायाधीश सोनाली जवळगेकर यांनी काढले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील महाविद्यालयात महिला विकास मंच आणि तालुका विधी सेवा समिती, श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक स्त्रीमध्ये आपण आपली आई पाहिली पाहिजे. ही जबाबदारी प्रामुख्याने पुरुष वर्गाची आहे. तसेच आपले काम कर्तव्य म्हणून न करता व्रतस्थ भावनेने व आत्मियतेने करावे असे विचार त्यांनी मांडले. या समारंभात न्यायाधीश श्रीम. जवळगेकर आणि लिमये विद्यामंदिर, दिवेआगरच्या प्रा. श्रीम.रश्मी अडुळकर यांना ‘तपस्विनी’ पुरस्कार देऊन महाविद्यालयाच्या वतीने सन्मानित करण्यात आहे. कार्यक्रमास आराठी ग्राम.पं.च्या सरपंच परविन नाझ या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करतांना कामाबद्दल आत्मियता व निष्ठा असावी व काम पूर्ण करण्याचा प्रामाणिक ध्यास धरावा अशी भावना रश्मी अडुळकर यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. विठोबा पाटील व अ‍ॅड. सौ. पोतदार यांनीही कायदेविषयक विचार व्यक्त केले.कार्यक्रमास ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. आशिष वढावकर, अ‍ॅड. वावेकर, सरकारी वकील अ‍ॅड. श्रीम. गायकवाड हेही उपस्थित होते.

यावेळेस डॉ. आयेशा शेख, गोदावरी करडे, नुहा जाविद ढांगु, क्षितिजा घोसाळकर, डॉ.सौ. जिंग्दाळे, सौ. सुजाता शिगवण, विशाखा जाधव, मृणाली पुरारकर, मिताली पुरारकर, सुविधा कोलथरकर या विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवीत असलेल्या माजी विद्यार्थिनींचा ‘स्फूर्तिज्योत’ पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिपाली पाठराबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. कल्याणी नाझरे, सुरेखा चित्ते, प्रा. स्वाती पानसरे, प्रा. नवज्योत जावळेकर आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version