। कर्जत । वार्ताहर ।
वाढत्या महागाईचा फटका आता सर्वांच्या आवडीचा झणझणीत वडापावला देखील बसला आहे. वडापावसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या पदार्थांचे दर महागले असल्याने वडापाव पाच रुपयांनी महागला आहे.
पूर्वी एक वडापाव 15 रुपयाला मिळत होता, सध्या 20 रुपयांना मिळतो. बेसन, लसूण, तेल यांचे वाढलेले दर आणि त्या पाठोपाठ पावाच्या पत्र्यात 15 रुपयांनी झालेली दर वाढ वडापावच्या दराना कारणीभूत असल्याचे मानले जाते. अडीअडचणीला पोट भरण्याची हमखास हमी देणारा वडापाव महागल्याने सर्वसामान्यांचे वांधे होणार आहेत. रस्त्यावर वडापावाच्या गाड्यांवर सहज मिळणारा वडापाव महागल्याने सर्वसामान्यांना आता जादा पैसे मोजावे लागतील. पाव बनवणार्या बेकरी मालकांनी पावाच्या एका पत्र्यामध्ये 15 रुपयांची दरवाढ केली. त्याचा फटका वडापावलादेखील बसला. यापूर्वी बेसन, लसूण, तेल महागल्यानंतर आता पावाची दरवाढ झाल्याने वडापावची किंमत वाढवावी लागली, असे कर्जतमधील वडापाव आणि मिसळसाठी प्रसिद्ध असलेले मावकर हॉटेलचे मालक विठ्ठल मावकर यांनी सांगितले. यापूर्वी 35 रुपयांना मिळणारा पावाचा पत्रा आता 50 रुपयांना घ्यावा लागत आहे. एका वडा पावाच्या किंमतीत 5 रुपयाची दरवाढ झाली आहे.
तेल, बेसण, लसूण, पाव, गॅस सिलेंडर यामध्ये दर वाढ झाल्याने, पर्यायाने सर्वच गोष्टी महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे वडापावच्या किंमती मध्ये दर वाढ केली आहे.
सट्टू दाभणे,
सट्टू वडेवाले, कर्जत