। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मागील चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या आहेत. या आरक्षणासंदर्भात येत्या 22 जानेवारी 2025 ला सर्वोच्च न्यायालयात निकाल असल्याने इच्छुक उमेदवारांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत.
ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांतील 27 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याने राज्य सरकारच्यावतीने ओबीसी आरक्षण मिळावं याकरिता प्रयत्न करत होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाकडुन तारीख पे तारीख पडत गेल्याने ओबीसी आरक्षणा शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. गेले चार वर्षे निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. पुन्हा ओबीसी आरक्षण संदर्भातील याचिका 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात असुन या सकारात्मक निकालाकडे इच्छुक उमेदवारांच्या नजरा लागुन राहिल्या आहेत.
मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील इच्छुक उमेदवार अशिलकुमार ठाकुर यांनी सांगितले की, गेले चार वर्षे नगरपरिषदेवर प्रशासक आहे. प्रशासक म्हणून शहरात काही चांगली कामे झाली. परंतु, वार्डात होणार्या नागरिकांच्या अडचणी सोडविण्यास प्रशासक कमी पडत आहे, तरी सर्वोच्च न्यायालयाने येणार्या 22 तारखेला चांगला निकाल द्यावा जेणेकरून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. या निवडणुकीमधुन नागरिकांना आपल्या मर्जीतील चांगले उमेदवार निवडुन देतील आणि होणारा नगरसेवक वार्डातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया अशिलकुमार ठाकुर यांनी दिली आहे.