। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील श्री महाजनाई महाजने क्रिकेट संघाच्यावतीने येथील मोठा माळ मैदानात रविवारी (दि.19) महाजने प्रिमिअर लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत राक्या तात्या इलेव्हन संघाने अग्नीवीर वॉरिअर्स संघाला पराभूत करून अंतिम सामना जिंकला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून महाजने येथे आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट सामने भरविले जात आहेत. या खेळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे या दृष्टीने ही स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत महाजने येथील राक्या तात्या इलेव्हन, अग्निवीर वॉरिअर्स, शेर शिवराज, पुष्पा द वाईल्ड फायर, झंझावात इलेव्हन या पाच संघाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन विलास भोनकर, महेंद्र औचटकर, विनायक भोनकर, आत्माराम पारंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
स्पर्धेतील अंतिम सामना राक्या तात्या इलेव्हन व अग्नीवीर या संघामध्ये झाला. अग्नीवीर संघाने सुरुवातीला फलंदाजी केली. अग्नीवीर संघाने मर्यादित तीन षटकांत 26 धावा करीत राक्या तात्या इलेव्हन संघासमोर विजयासाठी 27 धावांचे आव्हान उभे केले होते. राक्या तात्या इलेव्हन संघातील खेळाडूंनी सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजी करीत 27 धावांचे लक्ष अवघ्या 2.3 षटकात पुर्ण करून अंतिम विजय आपल्या संघाकडे खेचून आणला.
या स्पर्धेत राक्या तात्या संघाला प्रथम क्रमांकाचे, तर अग्नीवीर संघाला द्वितीय क्रमांकाचे चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज म्हणून अक्षय पारंगे ठरला. तसेच, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रमाकांत पाटील, सिक्सर किंग म्हणून सौरभ औचटकर यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संघाचे संघ मालक राकेश औचटकर, संकेत पारंगे, प्रेम कोलटकर, सौरभ औचटकर, जितेंद्र गुंड तसेच रामचंद्र पारंगे, संदीप औचटकर, किशोर पाटील, किरण पाटील, कुणाल मर्वाहा, खेळाडू, ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.