शिंदे-फडणवीस सरकारची सत्वपरीक्षा

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील सत्तांतरानंतर विधीमंडाच्या पावसाळी अधिवेशनाला तब्बल महिनाभराच्या विलंबाने बुधवार, 17 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सरकार यांची यानिमित्त सत्वपरीक्षा होणार आहे. सरकारला सर्व बाजूंनी कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनीही कंबर कसली आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून (17 ऑगस्ट) सुरू होत आहे. जवळपास दीड महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला विरोधकांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागणार आहे. विशेषत: शिवसेनेतील ठाकरे गट जास्त आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

मुंबईमध्ये 25 ऑगस्टपर्यंत चालणार्‍या या अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्षात सहा दिवसच चालणार आहे. 19 ऑगस्टला गोपाळकाला असल्याने दोन्ही सभागृहांना सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, शनिवार आणि रविवारीही सुट्टी असल्याने कामकाज होणार नाही. शिवाय, 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित सहा दिवस राज्यातील पूरस्थिती, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसह अन्य प्रश्‍नांवर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर येताच आधीच्या ठाकरे सरकारच्या काळातील अनेक निर्णयांना स्थगिती दिली तर, काही निर्णय फिरवले आहेत. त्यात बहुतांश निर्णय हे शिवसेनेशी निगडीत असल्याने शिवसेना जास्त आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेता शिवसेनेचा असल्याने तिथे सत्ताधारी शिवसेना विरुद्ध विरोधक शिवसेना असे चित्र पाहायला मिळेल.

शिवसेनेच्या निशाण्यावर शिंदे गट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. याच बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे शिवसेनेच्या निशाण्यावर शिंदे गट राहील, अशी शक्यता आहे.

Exit mobile version