। अलिबाग । प्रतिनिधी ।
उरण येथील बोरीपाखाडी येथे शासकीय जागेत माती उत्खनन करून शासनाची फसवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही बाब उरणचे तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देखील त्यांच्याकडून कारवाई करण्यास दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तहसीलदांराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येत आहे.
उरण तालुक्यातील बोरीपाखाडी या गावात सर्वे नं. 3/1 मध्ये उत्खनन करण्यास नारायण भोईर यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांना 41 गुंठे क्षेत्रामध्ये खोदकाम करण्याची परवानगी दिली आहे. या 41 गुंठे क्षेत्रातील जागेतून एक लाखहून अधिक ब्रास माती काढण्यात आली आहे. त्यामुळे माती उत्खननाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. अडीच हेक्टर जागेपैकी 41 गुंठे जागेमध्ये खोदाई करण्याचे आदेश असतानाही भोईर यांच्याकडून त्या नियमांचे उल्लंघन करीत अन्य क्षेत्रातील माती उत्खनन केले जात असल्याचा आरोप होत आहे. त्याच जागेमध्ये शासनाची जागा आहे. यापूर्वी शासकीय विश्रांती गृह असल्याची माहिती समोर येत आहे. ते जीर्ण झाल्याने दुर्लक्षीत राहिले आहे.
डोंगरभागात असलेल्या शासकीय जागेमध्येच खोदकाम करून शासनाच्या जागा बळकावण्याचे काम केले जात आहे. या प्रकारामुळे उरणमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. शासकीय जागा असल्याचा नकाशाही उपलब्ध झाला आहे. मात्र, ही जागा सरकारी नसल्याचा दावा उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांनी केला आहे. त्यामुळे भूमीअभिलेख विभागाचा नकाशा खोटा आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तहसीलदार हे तालुक्यातील महसूल विभागाचे प्रमुख मानले जातात. शासकीय जागेत खोदकाम केले जात असताना तहसीलदारकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शासकीय जागेत खोदकाम होत असल्याबाबत पाहणी केली जाईल. त्यानंतर संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.
– उद्धव कदम, तहसीलदार, उरण