भूधारकांना संपर्क साधण्याचे आवाहन
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
शासनाने 10 जानेवारी 2013 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना)ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती केली आहे. त्या अंतर्गत विकास आराखड्यामध्ये नगररचना परियोजनेद्वारे नियोजित आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. सध्या नैना क्षेत्रात 12 नगररचना परियोजना प्रस्तावित असून, त्यापैकी परियोजना क्रमांक 1 आणि 2 या अंतिम मंजुरी प्राप्त झालेल्या आहेत. तर, परियोजना क्रमांक 3 ते 7 यांना प्राथमिक मान्यता मिळाली आहे. तसेच, नगररचना परियोजना क्रमांक 8 ते 12 यांसाठी लवाद सुनावणीला डिसेंबर 2024 पासून सुरुवात झाली असून आता अंतिम टप्यात पोचलेली आहे. या सुनावणी प्रक्रियेमध्ये ज्या जमीनमालकांची हजर राहण्यासंबंधीची नोटीस प्राप्त झाली नाही, किंवा अन्य कारणास्तव सुनावणी झाली नाही, त्यांना 30 मेपर्यंत सुनावणी देण्याची सिडकोतर्फे मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी अशा जमीनधारकांनी कार्यालयीन वेळेत सीबीडी-बेलापूर येथील नैना कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात आले आहे.