मातीच्या उत्खननाने भूस्खलनाचा धोका वाढला

ग्रामस्थांची प्रशासनाकडे तक्रार

| महाड | प्रतिनिधी |

महाड आणि पोलादपूर मातीच्या उत्खननाने भूस्खलनाचा धोका वाढल्याने तालुक्यातील बेकायदेशीर होणारे उत्खनन बंद करण्यात यावेत तसेच चौकशी करण्यात यावी अशी मागणी जुई, कुंबळे, रोहन, दासगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

या दोन्ही तालुक्यात 2005 मध्ये प्रचंड प्रमाणात भूस्खलन झाले. अनेक ठिकाणी मातीचे डोंगरच्या डोंगर नागरी वसाहतीवर कोसळले आणि शेकडो नागरिक मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले. अनेक गावे उध्वस्त झाली. अशा दुर्घटना बेकायदेशी उत्खनन होत असल्याने घडत असल्याचे मत भूवैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. महाड तालुक्यातील वडवली गोंडाळे, किंजळोली, सव नागलवाडी कांबळे तर्फे बिरवाडी देशमुख, कांबळे, साखडी, कुसगाव, कोथेरी, नांदगाव, वरंध वरंडोली, चापगाव, खर्डी, कोकरे, तुडील कुंबळे, दासगाव, मोहोप्रे, चांडवे, पाचाड, आमडोशी, मांगरुण, दहिवड, वाकी, सोलमकोंड इत्यादी गावातून प्रचंड प्रमाणात मातीचे उत्खनन केले जात असल्याने अनेक गावांना धोके निर्माण झाल आहेत. स्थानिक ग्रामस्थांकडून वारंवार वरील विषयाच्या विरोधात तक्रारी करूनही स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. वडवली गावापासून काही अंतरावर प्रचंड प्रमाणात मातीचे उत्खनन गेल्या अनेक दिवसापासून सुरू असताना महसूल विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सव येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव, रावढळ येथील सुभाष लाले, वडघर येथील सखाराम किडबिडे, त्याचबरोबर कोल, चोचिंदे, कोथेरी ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत.

या परिसरातील असणार्‍या डोंगरांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यामध्ये माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून येते यामुळे गावांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत येथील महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत व गावाजवळ माती उत्खनन करू नये असे कळविलेले असताना विनापरवाना प्रचंड प्रमाणात मातीचे उत्खनन केले जात आहे. स्थानिक महसूल विभागाचे कर्मचारी तलाठी मंडळ अधिकारी यांच्या समक्ष उत्खनन सुरू असून याबाबत जिल्हास्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महाड पोलादपूर तालुक्यातील बेकायदेशीर उत्खनन त्वरित थांबण्यात यावे व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रावढळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र जंगम यांनी केली आहे.

Exit mobile version