उपचारासाठी तातडीने दिल्लीला हलविण्याची शक्यता
| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख तथा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत. मात्र, लवकरच त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीला हलवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लालू प्रसाद यादव हे पाटणा शहरात असताना त्यांची प्रकृती बिघडली. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना विमानाने दिल्लीला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, याच काळात राबडी निवास येथे असताना प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना पाटण्याच्या पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर पारस रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार चालू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना लवकरच एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला हलवले जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लालूप्रसाद यादव हे गेल्या दोन दिवसांपासून आजारी होते. बुधवारी (दि.2) त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर उपचार चालू असतानाचे काही फोटोदेखील समोर आले आहेत. त्यांच्या तोंडाला मास्क लावून त्यांना ऑक्सिजन पुरवला जात आहे. लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच राजद पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी राबडी निवास येथे गर्दी केली होती.
लालूप्रसाद यादव यांना मूत्रपिंडाशी संबंधित आजार असल्याचे 2022 मध्ये तपासणीत समोर आले होते. त्यांचे मूत्रपिंड 75 टक्के निकामी झाले होते. त्यानंतर त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देण्यात आला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लालूप्रसाद यादव यांची मुलगी राहिनी आचार्य यांनीच त्यांचे मूत्रपिंड वडील लालूप्रसाद यादव यांना दान करण्याचा निर्णय घेतला होता. 5 डिसेंबर 2022 रोजी ही सर्व प्रक्रिया पार पडली होती. गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मुंबईत त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंत आता लालूप्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.