। उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिका हद्दीत पुनर्विकासाच्या नावाखाली नव्या इमारतींचे बांधकाम वेगाने सुरू आहे. मात्र, यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना सोसायटीचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्यात संगनमत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सोसायटीतील सदस्यांमध्ये वादंग निर्माण झाले असून, सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुनर्विकास प्रक्रियेत काही सदस्यांचा विरोध असतानाही काही सोसायटीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी मनमानी निर्णय घेत असल्याचे आरोप होत आहे.
विशेषतः बिल्डरांकडून फ्लॅट खरेदी करणारे सभासद का होऊ शकत नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचबरोबर विद्यमान अध्यक्षांनी नियुक्त केलेले सेक्रेटरी सभासद नसल्याचा दावा केला गेला; मात्र; तरीही सहाय्यक निबंधक कार्यालयाने त्यांना मान्यता दिली. तसेच, काही जुन्या सभासदांना बडतर्फ करण्याचा अधिकार अध्यक्षांना किंवा सहाय्यक निबंधक अधिकार्यांना आहे का, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.