खड्डा न भरल्याने अपघाताचा धोका
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब या वर्दळीच्या राज्यमार्गावरील साईडपट्टी महिन्याभरापूर्वी एका खासगी नेटवर्क कंपनीकडून खोदून त्यात केबल टाकण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, कंत्राटदारांनी काम झाल्यानंतर साईडपट्टी व्यवस्थितपणे न भरल्याने येथे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे साईडपट्टी सुस्थित करावी, अशी मागणी वाहनचालक व स्थानिकांकडू केली जात आहे.
नेरळ-कळंब या राज्यमार्गालगत असलेल्या पोशीर ते पोही गावाच्या दरम्यान असलेली साईडपट्टी खोदल्याने एसटी बससह दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना धोका पत्करत प्रवास करावा लागत आहे. तर, काही निसटते अपघात देखील झाले आहेत. दरम्यान, साईडपट्टी खोदण्याचे काम सुरू असताना संबंधित जबाबदार अधिकार्यांना ही बाब काही सुज्ञ नागरिकांकडून निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, त्याकडे संबंधित विभागाचे व खासगी कंपनीच्या ठकेदाराकडून मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून गेले काही दिवस वाहनचालक व पादचारी यांचा सुरू असलेल्या जीवघेण्या प्रवासाबाबत प्रशासन मात्र उदासिन असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.