केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा अभिनव उपक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
सुरक्षित तट-समृध्द भारत या संकल्पनेवर अधारित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामार्फत गुजरात ते कन्याकुमारी सायकल मोहिमेचे (सायक्लोथॉन) आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेला 7 मार्चला गुजरातमधील लखपत किल्ला येथून सुरुवात झाली असून रायगड जिल्हयातील अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरावर गुरुवारी (दि.20) दुपारच्या सुमारास ही सायकल मोहिम दाखल होणार आहे. कंपनीमधील सुरक्षा राखण्याचे काम करीत असतानाच सागरी सुरक्षा, देशभक्ती भावना जागृत करणे, सागरी परंपरांचा सन्मान करणे याबाबत जनजागृती करण्याचे काम या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या मोहिमेत शंभरहून अधिक जवान सहभागी झाले असून 6 हजार 553 किलो मीटरचा सायकलमधून प्रवास केला जाणार आहे. 11 राज्यातून हा प्रवास असणार आहे. 25 दिवसांच्या कालावधीत ही मोहिम राबविली जाणार आहे.
गुजरातमधील लखपत किल्ला व पश्चिम बंगालमधील बखाली येथून ही मोहिम निघाली असून महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया, ओडिशामधील कोणार्क सुर्य मंदिर, तामिळनाडूतील कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक अशा देशभरातील पाच प्रमुख ठिकाणी विशेष कार्यक्रम घेऊन तेथील जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेल्या तेरा दिवसांपासून ही सायकल मोहिम सुरु असून गुरुवारी मांडवा बंदरावर ही मोहिम दाखल होणार आहे. त्यानंतर थळ येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. तेथून कोलाड मार्गे रत्नागिरी, गोवा ते कन्याकुमारी असा प्रवास असणार आहे. त्यानंतर या मोहिमेचा समारोप होणार आहे.
उपक्रमातून जागरूकता
सायक्लोथॉन मोहिमेद्वारे अंमली पदार्थ, शस्त्रास्त्र आणि स्फोटकांची तस्करी या सारख्या संभाव्य धोक्याबाबत जागरुकता करणे. नागरिक आणि सुरक्षा यंत्रणामधील समन्वय अधिक दृढ करणे, स्वातंत्र्य सैनिक, सुरक्षा दलाचे जवान आणि त्यांच्या कुटूंबियांच्या त्यागाची जाणीव करून देणे. किनारपट्टीतील समृध्द परंपरा, इतिहास, भौगोलिक विविधतेची ओळख करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.