सुस्थितीतले रस्ते तोडून सिमेंटचा रस्ता; तीन महिन्यांतच रस्त्याला भेगा
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
खड्डेमुक्त रस्ते या संकल्पनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे शहरात बहुतांश ठिकाणी डांबरी रस्त्यांचा जागेवर सिमेंटचे रस्ते निर्माण करण्याचे कामे सुरु आहे. ‘आले पालिकेच्या मना, तेथे नागरिकांचे चालेना’ अशा पद्धतीचा कारभार प्रशासकीय राजवटीत सुरु आहे. त्यामुळे याला नागरिकांचा विरोध असताना देखील सुस्थितीतील डांबरी रस्ते खोदून करोडो रुपयांचा खर्च करून सिमेंटचे रस्ते बनवले जात आहेत. डांबरी रस्ता जर दर्जेदार बांधला तर तो कित्येक वर्षे टिकतो हे पुण्यातील जंगली महाराज रोडने समप्रमाण सिद्ध केलेले आहे. मात्र, रस्ते निर्माण करणारी यंत्रणाच जर भ्रष्टचाराने बरबटलेली असेल तर सिमेंटचे रस्ते देखील अल्पयुषीच ठरतात, याची प्रचिती नवी मुंबई महानगरपालिकेत येते असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.
दरम्यान, बेलापूर रेल्वेस्टेशन आणि कोकण भवन यांच्या मधील सुस्थितीतील डांबरी रस्ता खोदून नव्याने सिमेंटचा रस्ता बनविण्यात आला होता. मात्र, दोन-तीन महिन्यांतच या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाची तक्रार नवी मुंबईच्या सजग नागरिक मंचाने पालिका आयुक्तांना केली होती. पर्यायाने केवळ 3 महिन्यातच नव्याने बांधण्यात आलेला रस्ता पूर्णपणे उघडण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढवलेली होती. रस्त्याच्या निकृष्ट दर्जासाठी कंत्राटदाराला उत्तरदायी ठरवत पालिकेने या रस्त्याची पुनर्बांधणी दोषनिवारण कालावधी अंतर्गत कंत्राटदाराकडून करून घेतली. परंतु, रस्त्याच्या निकृष्ट दर्जासाठी केवळ कंत्राटदाराला दोषी ठरवणे म्हणजे अभियंत्यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. त्यामुळे बेलापूर विभागातील स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता व पर्यायाने शहर अभियंता यांना दोषी ठरवत नियमानुसार कारवाई करा, अशी मागणी नागरिक मंचाने आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीची नोंद घेत शहर अभियंत्यांनी बेलापूर विभागाचे कनिष्ठ अभियंता व उपअभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून वस्तुस्थितीदर्शक लेखी खुलासा 7 दिवसांत करण्याचे आदेश दिलेले आहेत.
नव्याने बांधलेला सिमेंट रस्ता तोडून पुन्हा रस्ता बनविण्याची वेळ आल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या सर्वच रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरविकास खात्याच्या सचिवांनी मागील 3 वर्षात पालिकेने बांधलेल्या सर्वच रस्त्यांच्या दर्जाची पडताळणी करण्यासाठी बाह्य यंत्रणेकडून ऑडिट करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना द्यावेत. सिमेंटचे रस्ते बांधताना जे सॅम्पल घेतलेले आहेत त्याची व्हीजेटीआय किंवा सीओईपी मार्फत तपासणी केली जावी. तटस्थ यंत्रणेमार्फत केलेल्या दर्जतपासणीचा अहवाल पालिकेच्या संकेतस्थळावर खुला करावा.
सुधीर दाणी,
संघटक, सजग नागरिक मंच नवी मुंबई