। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील राहत्या घरातील हौदात पडून मृत्यू झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या खुनाचा तपास लावण्यात अखेर शिल्लेगाव पोलिसांना अवघ्या पाच दिवसात यश आले आहे. पत्नीनेच झोपेत दगड घालून खून केल्यावर पतीला घरातील हौदात टाकून दिल्याचे समोर आले आहे. याबाबतची कबुली दिलेल्या पत्नीवर शिल्लेगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयित आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. भारती पमुसिंग पपैया (51) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
लासूर स्टेशन येथील डोणगाव रोडवरील हनुमान मंदिर येथील सेवानिवृत्त शिक्षक पमुसिंग छगनसिंगग पपैया (64) हे 13 मार्च रोजी राहत्या घरी पाण्याच्या हौदात पडले. त्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. शिक्षकाचा मृत्यू हौदात पडून झाला की खून झाला याबाबत ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा होती. याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसांनी मयताच्या मनोरुग्ण पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता भारती पपैया हिने पतीच्या खुनाची कबुली दिली.
लग्न झाल्यापासून मुलबाळ होत नव्हते म्हणून आमच्यात कायम खटके उडायचे घटनेच्या दिवशी आमच्यात कडाक्याचे भांडण झाले व रात्री झोपेत असलेल्या नवर्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर कोणाला खुनाचा संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह घरातच असलेल्या पाण्याच्या हौदात नेऊन टाकला.