शेकापच्या बैठकीनंतर सांगोल्यात चैतन्य

। सांगोला । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, नव्या पिढीतही पुरोगामी विचार रुजविण्यासाठी, भविष्यात शेतकरी कामगार पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकित शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केलेल्या प्रभावी भाषणामुळे सांगोल्यातील राजकिय वातावरण बदलले असल्याचे चित्र दिसून आले. आ. जयंत पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती निर्माण झाली होती.

लाल बावट्याची ताकद, पक्षाबाबतचा अभिमान, भाषणातून मिळालेली उर्जा कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. विश्‍वविक्रमी आमदार स्व. गणपतराव देशमुख यांच्या पत्नी आक्कासाहेब यांच्या उपस्थितीमुळे सर्वत्र चैतन्य निर्माण झाले होते. या कार्यक्रमामुळे सांगोल्यात शेकाप एकसंघ असल्याचे स्पष्ट झाले. कार्यकर्त्यांमधील उत्साह, स्फूर्ती वाढविण्याचे काम आ. जयंत पाटील यांनी त्या दोन तासांच्या मार्गदर्शन भाषणात केले.

सभेच्या दुसर्‍या दिवशीही संपूर्ण सांगोला तालुक्यात आ. जयंत पाटील यांनी घेतलेले धाडसी निर्णय, प्रभावी भाषणाचीच चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे एरव्ही राजकारणावर बोलणे टाळणार्‍यांनीही आ. जयंत पाटील यांचे कौतुक केले. तसेच आ. जयंत पाटील यांनी ज्या प्रमाणे सांगोल्याची जबाबदारी घेतली, कार्यकर्त्यांसोबत वेगळेच नाते निर्माण केले, ते हृदयाला भिडले असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Exit mobile version