बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्याला फाशी; ‘पोक्सो’अंतर्गत आरोपीला दुसरी शिक्षा

। मुंबई । वार्ताहर ।
नऊ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या ३३ वर्षांच्या तरुणाला दिंडोशी येथील विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. बलात्कार आणि हत्येची ही घटना चार वषापूर्वी घडली होती. बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) आरोपीला झालेली ही दुसरी शिक्षा आहे. त्याने कारागृहातून सुटल्यानंतर आठ महिन्यांतच हा गुन्हा केला होता.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. सी. शेंडे यांनी फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव वडिवेल ऊर्फ गुंडप्पा चिन्ना तंबी देवेंद्र असे आहे. याच न्यायालयाने गुरुवारी साकीनाका येथील ३२ वर्षीय महिलेवर बलात्कार व त्यानंतर तिच्या हत्येच्या आरोपाप्रकरणी अन्य एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.


न्यायालयाने मंगळवारी देवेंद्रला त्याच्यावरील सर्व आरोपांत दोषी ठरवले होते. त्यानंतर त्याला कोणती शिक्षा व्हावी याबाबत युक्तिवाद करण्यात आला. आरोपी हा समाजासाठी धोका असल्याचे आणि त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ घटना मानावी. तसेच त्याला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती.
आरोपीला यापूर्वी, २०१३ मध्येही नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्याला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचाच संदर्भ देत सरकारी पक्षाने आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करताना दिला. पहिल्या गुन्ह्यात आरोपीची कारागृहातून आधीच सुटका झाली. परंतु सुटका झाल्यानंतर आठ महिन्यांतच त्याने दुसरा गुन्हा केला. त्याला कायद्याची आणि शिक्षेची भीती नाही हेच त्याच्या वर्तणुकीतून दिसून येते. त्याच्यात सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नाही. याउलट आरोपी हा समाजासाठी धोका असून त्याला फाशीची मागणीच योग्य असल्याचा दावा सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. तर हे प्रकरण पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे.
हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरणात मोडत नाही, असा दावा करून आरोपीच्या वकिलाने त्याला शिक्षेत दया दाखवण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने मात्र आरोपीत सुधारणा होणे अशक्य असल्याचे नमूद करून त्याला फाशीची शिक्षा सुनावली.

Exit mobile version