अर्बन महाविद्यालयात औषधी वनस्पतींचे प्रदर्शन

। दाभोळ । प्रतिनिधी ।

औषधी वनस्पतींची ओळख व महत्व पटवून देण्यासाठी दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विभाग आणि कॉप्स नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पतींचे प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन दापोली शिक्षणसंस्थेचे सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी आणि प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रदर्शनामध्ये शंभरहून अधिक औषधी वनस्पतींचा समावेश होता. यात प्रामुख्याने जासूद, रक्तचंदन, काळा कुडा, सीता अशोक, गुडमार, अग्निमंथ, अश्‍वगंधा, नीरब्राह्मी, समुद्रफळ, सर्पगंधा, वावडिंग, शिकेकाई, वेखंड आदी गुणकारी वनस्पतींचा समावेश होता. वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी या औषधी वनस्पतींचे शास्त्रीय नाव, त्यातील घटक व औषधी गुणधर्म याबद्दल माहिती दिली. दापोली तालुक्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, दापोली शिक्षणसंस्थेचे सदस्य आणि अनेक जाणकार नागरिक प्रदर्शनाला उपस्थित होते.

Exit mobile version