मद्यपींना ‘विदेशी’ चटक

| अलिबाग | कृषीवल टीम |

‌‘पीनेवालों को पीने का बहाना चाहिए’, असं म्हटलं जातं. कधी दु:खात तर कधी आनंदात पार्टी म्हणून, कधी काही कारण नसताना, तर कधी व्यसन जडल्यामुळे दारू पिणाऱ्यांचे प्रमाण हे वाढतच आहे. अनेकदा महिलांकडून दारूबंदीची मागणी केली जाते; परंतु दारू विक्रीतून जास्त महसूल मिळत असल्यामुळे त्या मागणीकडे फारसे गांभिर्याने पाहिले जात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्यंतरी महामार्गालगत पाचशे मीटर अंतरापर्यंतचे परमीट रूम आणि बिअर बार बंद झाले होते; परंतु सुधारित निर्णयानंतर ते पुन्हा सुरू झाले. जानेवारी ते डिसेंबर 2023 या एक वर्षाच्या आकडेवारीनूसार रायगड जिल्ह्यात विदेशी दारुसह बियरला जास्त मागणी असल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत रायगडकरांनी 1 कोटी 2 लाख 70 हजार 214 लिटर वेिदेशी तर 1 कोटी 96 लाख 31 हजार 906 लिटर बियर रिचवली. रायगडकरांना लागलेली मद्याची चटक दूर व्हावी, यासाठी आता अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत.

जिल्ह्यात गेल्या जानेवारी ते डिसेेंबर या पाच महिन्यांत मद्यप्रेमींनी देशी 87 लाख 16 हजार 310 लिटर व 5 लाख 33 हजार 907 लिटर वाईन रिचवली. अधिकृतरित्या विक्रीशिवाय रायगड जिल्ह्यात अवैध दारुविक्रीदेखील जोमात सुरु आहे. पोलिसांकडून अनेकदा अभय मिळत असल्यामुळे हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. गेल्या वर्षभरात रायगड जिल्ह्यात केवळ 2189 गुन्हे दाखल झाले असून या गुन्ह्यात 2158 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 5 कोटी 84 लाख 29 हजार 316 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यासाठी आरोपींनी ज्या वाहनांचा वापर केला अशा 125 वाहनानेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

पनवेलमध्ये सर्वाधिक कारवाया
पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून अवैधरित्या दारु व्रिक्रीचे प्रमाणही खूप आहे. वर्षभरातील आकडेवारीनूसार पनवेल तालुक्यात सर्वाधिक कारवाया करण्यात आल्याचे दिसून येते. नवी मुंबई पोलिसांमार्फत जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 190, मे ते सप्टेंबर 283, ऑक्टोबर ते डिसेंबर 230 आणि यावर्षीच्या जानेवारी ते फेब्रुवारीच्या कालावधीत 106 अशा एकूण 809कारवाया करण्यात आल्या आहेत.
सुधागडमध्ये अल्प प्रमाण
सुधागड तालुक्यात कारवाईचे प्रमाण अल्प असून गेल्या वर्षभरात केवळ 4 कारवाया करण्यात आल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अवैधरित्या दारु विक्रीचे प्रमाण या तालुक्यात कमी असल्याचे दिसून येते.
गेल्या दोन महिन्यात पनवेल, अलिबाग अव्वल
यावर्षीच्या कारवाईंची आकडेवारी पाहता जानेवारी ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत रायगड जिल्ह्यात 330 कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये पनवेल 106 तर अलिबागमध्ये 85 कारवाया करण्यात आल्या आहेत. तर सुधागड तालुक्यात एकही कारवाई करण्यात आलेली नाही.
5 कोटी 84 लाख 29 हजार 316 रुपयांचा मुद्देमाल जप्त
125 वाहनांचा समावेश
मे ते सप्टेंबरमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण जास्त
रायगड जिल्ह्यात झालेल्या अवैध दारु विक्रीच्या गुन्ह्यांची आकडेवारी लक्षात घेता मे ते सप्टेंबरच्या कालावधीत पोलिसांनी सर्वाधिक 922 गुन्हे दाखल केले आहेत. तर वर्षअखेर असतानाही ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत केवळ 648 कारवाया करण्यात आल्या आहेत.
Exit mobile version