| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
हवेत उडणाऱ्या लोकांसाठी चांगले दिवस आहेत. परंतु, जमीनीवर चालणाऱ्यांचे दिवस बिकट झाले आहेत. श्रीमंताना जाण्यासाठी उत्तम व्यवस्था केली जाते. गरीब मात्र खड्डयातूनच प्रवास करत आहे, अशी घणाघाती टीका माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली. नवी मुंबई विमानतळ आणि अलिबाग पेण रस्त्यावरील दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त करीत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. श्रीमंत, गरीब अशी दरी निर्माण केली जात आहे. जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम केले जात आहे. जाती जातीमध्ये न लढता आपल्या न्याय हक्कासाठी लढा, असे आवाहन त्यांनी केले. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.9) अलिबागमध्ये हक्क यात्रा काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
सभेच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सभा मंडपापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅली दिव्यांगसह असंख्य नागरिक सहभागी झाले होते. याप्रसंगी माजी मंत्री तथा प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सांगितले की, हा लढा कोणत्याही जाती, धर्मासाठी नाही, तर शेतकरी, मच्छिमार, दिव्यांग, मेंढपाळांच्या न्याय हक्कासाठी आहे. मुंबईची ओळख गिरणी कामगार म्हणून होती. परंतु, ती ओळख आता राहिली नाही. रक्ताचे पाणी करून मुंबईला जपण्याचे काम केले. त्यांची घरे कधी मोठी झाली नाही. मात्र, त्याच मुंबईत नेते आणि उद्योगांची घरे मोठी झाली असल्याचे चित्र आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणारे विकास कधीच करू शकत नाही, असे बच्चू कडू म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले, पंतप्रधान यांनी अपंगावरून दिव्यांग शब्द आणला. परंतु, त्या दिव्यांगांना सुविधांसाठी आजही भांडावे लागत आहे. पंधराशे रुपये देऊन मुर्ख बनविण्याचे काम केले जात आहे. त्यावर प्रहार केला जाणार आहे. मुंबई अलिबागच्या अगदी जवळ आहे. आर्थिक राजधानीच्या बाजूला असलेल्या अलिबागला सावली पडली असती, तर अलिबाग चमकले असते. परंतु, अलिबागची अवस्था काय आहे, हे दिसून आले आहे, अशी टीका कडू यांनी केली.







