खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी सुरु केला लढा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महावितरणचे खासगीकरण शासनाकडून सुरु करण्यात आले. या खासगीकरणासह विविध मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लढा सुरु केला आहे. गुरुवारपासून (दि.9) तीन दिवस संप पुकारला आहे. सकाळी अलिबागमधील अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आणि दुपारी पेण येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
महानिर्मितीच्या ताब्यातील जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण, महापारेषणमधील टीबीसीबीच्या माध्यमातून सुरु झाले आहे. महावितरण कंपनीमधील एकतर्फी पुनर्रचना केली जात आहे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीतील विविध मार्गाने होणाऱ्या खासगीकरणाविरोधात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संप सुरु केला आहे. राज्य शासनाने मंजूर केलेली पेन्शन योजना लागू करा. मागासवर्गीय पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नत्तीमध्ये आरक्षण लागू करा. तिन्ही कंपनीमधील वर्ग तीन व चार स्तरावरील संवर्ग निहाय रिक्त पदे भरण्यात यावी. सरळसेवा भरती, पदोन्नती व अंतर्गत भरती द्वारे मुळ बी. आर प्रमाणे भरणे. कंत्राटी व बाह्यस्त्रोत कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करण्यात धोरण राबविणे अशा अनेक मागण्यांसाठी हा लढा सुरु केला आहे.
महावितरण कंपनीमध्ये दीड हजारहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये नियमीत कर्मचारी 750 असून त्यापैकी 500 कर्मचारी संपावर गेले आहेत. महावितरणचे कर्मचारी संपावर गेल्याने वीज पुरवठा सेवा सुरळीत करण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम शासकीय कार्यालयांसह दवाखाने व सर्वसामान्य नागरिकांना होण्याची भिती निर्माण झाली आहे. 72 तासांच्या संपाचा परिणाम जिल्ह्यातील वीज सेवेवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महावितरण कंपनीचे कर्मचारी रात्री बारा वाजल्यापासून नियमीत कर्मचाऱ्यांपैकी 70 टक्के कर्मचारी संपावर गेले आहे. बाह्यस्त्रोतमधील 750 कर्मचारी तसेच 22 एजन्सीचे कर्मचारीदेखील कार्यरत आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. काही प्रमाणात कामामध्ये विलंब होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
धनराज बक्कड
अधिक्षक अभियंता






