ग्रामस्थ अंधारात, उन्हामुळे परिस्थिती गंभीर
| नेरळ | प्रतिनिधी |
महावितरण कंपनीच्या कर्जत तालुक्यातील कडाव येथील वीज रोहित्रामध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये सुदैवाने दुर्घटना टळली असून, महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, सध्याचे वाढलेले तापमान कडाव ग्रामस्थ गरमीने हैराण झाले आहेत.
कडाव गावातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरचा मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती की, वीज रोहित्र असलेल्या चिनी मातीच्या बुशिंग फुटून रस्त्याशेजारील दुकानापर्यंत उडाल्या. त्याचवेळी रस्त्यावर पडलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलने पेट घेतला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने रहदारी कमी होती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 100 केव्हीए क्षमतेच्या त्या कडाव येथील वीज रोहित्रावरून वीजपुरवठा होत असतो. त्यात कडावसाठी 200 केव्हीए क्षमतेचे वीज रोहित्र बसवावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. स्थानिकांच्या मागणीनंतर महावितरण कंपनीचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. वीज रोहित्रामध्ये स्फोट झाल्याने कडाव गाव हा रात्रभर अंधारात होता. कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने घामाच्या धारांनी ग्रामस्थ हैराण झाले.
कमी दाबाचे वीज रोहित्र सतत दाबाचा प्रश्न निर्माण होत असतो. मात्र, त्याकडे महावितरणचे अधिकारी याची गांभीर्याने दखल घेत नाहीत. वीज रोहित्रमध्ये स्फोट होण्याची घटना दि.19 च्या रात्री घडल्याने तेथे जीवितहानी झाली नाही. त्यानंतर आता हे बिघडलेले वीज रोहित्र पनवेल येथे नेऊन दुरुस्त करावे लागणार आहे. मात्र, सततचे कडाक्याचे वाढलेले तापमान लक्षात घेऊन प्रचंड उष्माचा तडाखा सहन करावा लागत आहे. मात्र, आता नव्याने वीज रोहित्र बसविताना 100 केव्हीएऐवजी 200 केव्हीएचे रोहित्र बसविण्यात यावे, अशी मागणी कडाव ग्रामस्थ करीत आहेत.