| अलिबाग | प्रतिनिधी |
भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.1 ते दि.30 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता पर्व कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि.11 एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग तालुक्यातील सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या विविध स्पर्धा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग यांच्या वतीने लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे वरिष्ठ महाविद्यालय, चोंढी किहीम येथे वक्तृत्व, निबंध व एकांकिका स्पर्धा संपन्न झाल्या.
या कार्यक्रमासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव, कार्यालय अधीक्षिका श्रीमती माधुरी पाटील, गृहपाल संदिप कदम, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे वरिष्ठ महाविद्यालय चोंढी किहीमचे कार्यवाहक रविंद्र ठाकूर, प्राचार्य लिना पाटील, प्राध्यपक व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड-अलिबाग यांच्या अधिनस्त मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, पाली, पनवेल, महाड येथेही निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. दि.11 एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त मुलींचे शासकीय वसतिगृह पनवेल यांच्यामार्फत रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीमध्ये वसतिगृहातील विद्यार्थिनींनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. तसेच वसतिगृहातील विद्यार्थिनींनी महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा जो पाया रचला. त्यावर आधारित पथनाट्य सादर केले.
या स्पर्धांसाठी वसतिगृहातील व महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी परीक्षा कालावधीतही उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामध्ये प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचे कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी कळविले आहे.