| उरण | वार्ताहर |
उरण शहरातील राजपाल नाका येथे गॅस सिलेंडरचे दुरुस्ती दुकानात गॅस गळती असलेल्या सिलेंडरची दुरुस्ती करत असताना सोमवारी (दि.23) सकाळी 9:30 च्या सुमारास अचानकपणे सिलेंडरने पेट घेतला. अचानक सिलेंडरला आग लागल्याने दुकान चालकाने ते सिलेंडर राजपाल नाक्यावर(खिडकोळी नाक्यावर )भर रस्त्यावर टाकून दिले. आगीचा मोठा भडका उडाला होता. रस्त्यावर अचानक आग लागलेले सिलेंडर टाकल्याने या ठिकाणी प्रवास करणार्या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता.
राजपाल नाका हे बाझारपेठेत असल्याने ते गर्दीचे, वर्दळीचे ठिकाण आहे. मात्र आग विझविल्याने, प्रसंगावधानते मुळे अनेकांचे प्राण वाचले आहे. दुकान चालकानेे प्रसंगावधान साधत आग लागलेल्या सिलेंडर वर गोणी टाकून त्यावर पाणी टाकले व आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने यावेळी कोणतेही जीवितहानी झाली नाही.
नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणार्या व बेकायदेशीरपणे सिलेंडरचे दुकान चालवीणार्या दुकान चालकावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी नरेश भोईर यांच्यासह व्यापारी वर्गांनी, प्रवाशी जनतेने केली आहे .सिलेंडरला आग लागल्याने उरण शहरातील सुरक्षाचे तीन तेरा वाजले असल्याचे दिसून येते. उरणच्या नागरिकांची सुरक्षा आता राम भरोसे आहे. मात्र एवढी मोठी घटना घडून सुद्धा दुकान चालकावर कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यात आले नसल्याने उरण शहरातील व्यापारी वर्गानी, प्रवाशी वर्गांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सिलेंडर दुकान चालकाची फक्त चौकशी करून त्याला सोडण्यात आल्याने प्रवाशी व व्यापार्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राजपाल नाका येथे सिलेंडरला आग लागल्याचे समजताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. पोलीस ज्यावेळी घटना स्थळी गेले त्यावेळी आग विझलेली होती. सिलेंडरला लागलेली आग किरकोळ स्वरूपाची होती.