। बुलढाणा । प्रतिनिधी ।
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका रुग्णाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच रुग्णालयाचेही मोठे नुकसान झाले आहे.
घटनेतील मृत व्यक्ती हरिभाऊ रोकडे हे रविवारी (दि. 22) दुपारी लोणार बसस्थानकावर अत्यावस्थेत आढळून आले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ लोणार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला सोमवारी (दि. 23) पहाटे हरिभाऊ रोकडे यांना ठेवण्यात आलेल्या वॉर्डमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत हरिभाऊ रोकडे यांच्या बेडला आग लागल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने आग लागली त्यावेळी रुग्णालयात एकच रुग्ण उपचारासाठी भरती होता. मात्र, या आगीत रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पाहणी करून पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. तसेच हरिभाऊ रोकडे रूग्णालयात बिडी ओढत असल्याचे समोर आले होते. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना बिडी ओढू नका, असे सांगितले होते. त्यामुळे सदर आगीची घटना ही रूग्णाने बिडी ओढल्यामुळे घडली की शॉट सर्किटने घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास लोणार पोलिस करीत आहेत.