श्रीवर्धनमध्ये चौघांवर हद्दपारीची कारवाई

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील आराठी ग्रामपंचायत हद्दीतील मेटकर्णी परिसरातील चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन यांच्या आदेशानुसार हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये अमित निरंजन शिगवण, सोनू संतोष रसाळ, विकास संतोष रसाळ आणि गणेश रामनाथ निकम (रा. मेटकर्णी) यांचा समावेश आहे. संबंधित व्यक्तींविरुद्ध श्रीवर्धनसह दापोली, मंडणगड, गोरेगाव आणि म्हसळा पोलीस ठाण्यांमध्ये विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

यामध्ये चोरी, सार्वजनिक शांतता भंग करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, पोलीस ठाण्यात गोंधळ घालणे, मारामारी, महिलांचा छळ तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या घटनांशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित व्यक्तींविरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याने श्रीवर्धन पोलिसांनी त्यांच्या हद्दपारीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी हद्दपारीचे आदेश जारी केले.

दरम्यान, मेटकर्णी तसेच श्रीवर्धन तालुक्यातील आणखी काही संशयित व्यक्ती पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक गैरव्यवहार, खंडणी उकळणे, फसवणूक, बेकायदेशीर जमावबंदीचे उल्लंघन करणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या कृत्यांमध्ये सहभागी आढळल्यास संबंधितांविरुद्धही कठोर कारवाई करण्यात येऊ शकते, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

परिसरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.

Exit mobile version