पाच जणांवर गुन्हा, दोघांना अटक
| नेरळ | प्रतिनिधी |
पनवेल-कर्जत लोकल रेल्वे मार्गाच्या सुरू असलेल्या कामामध्ये खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कर्जत पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील चौकशीत आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
किरवली (ता. कर्जत) गावाजवळ केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पनवेल-कर्जत लोकल रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे काम मे. शंकर रामचंद्र इन्फ्रा प्रा.लि. ही कंपनी करीत असून, कंपनीकडून प्रदीप प्रकाश विश्वास हे कामकाजाची देखरेख करत आहेत.
दरम्यान, विशाल गायकवाड, विनोद बडेकर, प्रितेश भोईर उर्फ बाबू, मयूर गायकवाड आणि अविनाश रघुनाथ बडेकर सर्व रा. किरवली, ता. कर्जत, जि. रायगड यांनी 26 फेब्रुवारी ते 9 मार्च 2026 या कालावधीत कामाच्या ठिकाणी वारंवार येऊन फिर्यादींकडे खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. “तुम्ही बाहेरून येऊन आमच्या परिसरात काम करता, आम्हाला दहा गाड्या द्या, अन्यथा हात-पाय तोडू,” अशी धमकी देत त्यांनी खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच आरोपींनी कामाच्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करून काम बंद पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.
