अतिउच्च दाबाची वीजवाहिनी बेकायदा

निजामपूर ग्रामस्थांकडून संताप व्यक्त

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील निजामपूर परिसरात खासगी कंपनीच्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या टाकल्या जात असलेल्या अतिउच्च दाबाच्या वीजवाहिनीविरोधात ग्रामस्थांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांची संमती न घेता आणि कायदेशीर प्रक्रिया न पाळता सुरू असलेले हे काम तात्काळ बंद करावे, अन्यथा न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील कोस्ते बुद्रुक येथे खासगी जे.टी.एल. कंपनीच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून अतिउच्च दाबाची वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम पूर्णपणे बेकायदेशीर असून स्थानिक नागरिकांची कोणतीही परवानगी किंवा संमती घेतलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

याप्रकरणी निजामपूर परिसरातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने माणगाव उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाणे तसेच वीज वितरण कंपनीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. स्थानिक नागरिक सुधीर पवार यांच्या मालकीच्या खासगी जमिनीमधून तसेच इतर ग्रामस्थांच्या जमिनीमधून ही वीजवाहिनी नेली जात आहे. संबंधित जमिनी औद्योगिक वापरासाठी खरेदी करण्यात आल्या असून, या प्रकल्पामुळे भविष्यात जमीन वापरावर गंभीर मर्यादा येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय पानस्पे येथील पाझर तलावामध्येही वीजवाहिनीचे खांब उभारण्यात येत असल्याने जीविताला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तलाव परिसरात मच्छिमारी करणारे आदिवासी, पाणी वापरणाऱ्या महिला, जनावरे आणि लहान मुले यांच्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, प्रस्तावित दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही वीजवाहिनी भविष्यातील विकासकामांनाही अडथळा ठरू शकते, असा मुद्दाही नागरिकांनी उपस्थित केला आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की, प्रशासनाने कोणतीही सभा न घेता, हरकती न विचारता आणि कायदेशीर प्रक्रिया न पाळता हे काम सुरू केले आहे. उलट, “हे सरकारचे काम आहे” असे सांगत स्थानिकांना धमकावले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, तात्काळ काम थांबवले नाही तर न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आदेश मिळवला जाईल.

Exit mobile version