महाराष्ट्रामध्ये पुन्हा उष्णतेची तीव्र लाट

12 जिल्ह्यांना यलो अलर्ट
। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यात मागच्या काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ सुरू आहे. या वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्याही पुढे गेले आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम दैनंदिन आयुष्यावरही दिसून येत आहे. यादरम्यान, हवामान विभागाने राज्यात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने राज्यातील 12 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना हवामान विभागाने नागरिकांना दिल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा हा कमालीचा वाढला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांसाठी इशारा जारी करण्यात आला आहे. यावरून मराठवाड्यासह कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात उष्णतेचा चटका वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशाच्या या राज्यांतही उष्णतेची लाट

आयएमडीनुसार, राजस्थान, उत्तर प्रदेश, दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा-दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये पुढील 5 दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. याशिवाय पुढील 3 दिवस गुजरातच्या उत्तरेकडील भागात उष्णतेच्या लाटेचा प्रकोप राहील. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश, विदर्भ, बिहारचा काही भाग आणि जम्मू प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घरबाहेर पडू नका हे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Exit mobile version