नियम पाळून निवडणुकीला सामोरे जा: निकम

| चिरनेर | वार्ताहर |
ग्रामपंचायतीची निवडणूक आयोगाचे नियम पाळून, खेळीमेळीच्या वातावरणात लढवा आणि निवडणुकीदरम्यान व त्यानंतरही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पुरेपूर काळजी घ्या, यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य केले जाईल, असे आवाहन उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी केले आहे.

चिरनेर ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 5 नोव्हेंबरला होणार आहे. त्या अनुषंगाने सतीश निकम यांच्या मुख्य उपस्थितीत चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. यावेळी गावातील विविध पक्षांचे पक्षश्रेष्ठी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नवरात्र उत्सवाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, गावाच्या विकासाकरिता गावाची एकजूट करा, ही एकजूट महत्त्वाची आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदाची निवडणूक ही बिनविरोध करा, शासनालाही असे निर्णय अपेक्षित असतात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दरम्यान, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे शासनाने पारित केलेल्या आदेशाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करू नका. जेणे करून सार्वजनिक शांतता धोक्यात येईल. दरम्यान, निवडणुकीचा व नवरात्र उत्सव कालावधी एकच आल्याने ही दुहेरी जबाबदारी आपल्यावर आता पडली आहे. त्यामुळे नवरात्र उत्सवात शासनाने दिलेले नियम व वेळेच्या बंधनाच्या मर्यादा सांभाळाव्यात. सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना करा, असे आवाहन करून, काही महत्त्वाच्या सूचनाही त्यांनी आपल्या भाषणातून यावेळी दिल्या.

या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत भोईर, शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उद्योगपती राजेंद्र खारपाटील, पोलीस पाटील संजय पाटील, माजी सभापती भास्कर मोकल, तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, शेकापचे सुरेश पाटील, माजी सरपंच पद्माकर फोफेरकर, माजी उपसरपंच गोपीनाथ गोंधळी, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, माजी उपसरपंच समाधान ठाकूर, धनेश ठाकूर, गजानन वशेणीकर, राजेंद्र भगत, किरण कुंभार, चंद्रकांत गोंधळी, जयेश खारपाटील, अन्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांचेही श्री. निकम यांनी निरसन केले. शेवटी पोलीस पाटील संजय पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Exit mobile version