। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतातील अयोग्य, चुकीची माहिती आणि द्वेषयुक्त सामग्रीचे प्रसारण हाताळण्यास फेसबुक उपयोजक असमर्थ ठरला आहे. फेसबुकच्या अंतर्गत दस्तऐवजांवरून असे दिसून आले आहे की, कंपनीला तिच्या सर्वात मोठ्या बाजारपेठ असलेल्यस भारतामध्ये अयोग्य माहिती, द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचारावरील सामग्री हाताळण्यात अयशस्वी झाल्यामुळे अनेक समस्या येत आहेत.
न्यूयॉर्क टाईम्स आणि असोसिएटेड प्रेससह वृत्तसंस्थेने यासंदर्भात आपला अहवाल दिला आहे. कंपनी चुकीची माहिती, द्वेषयुक्त भाषण आणि हिंसाचाराच्या घटनांवर आनंद साजरा करणार्या घटना यांच्याशी झुंज देत असल्याचे अंतर्गत कागदपत्रे दाखवतात, असे या अहवालामध्ये म्हटले आहे. न्यूयॉर्क टाईम्सने फेसबुकच्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, भारतातील 22 मान्यताप्राप्त भाषांपैकी केवळ पाच भाषांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सामग्रीचे विश्लेषण करण्याची सुविधा आहे, पण हिंदी आणि बंगालीचा आत्तापर्यंत समावेश करण्यात आलेला नाही. ही माहिती फ्रान्सिस होगेन यांनी गोळा केलेल्या सामग्रीचा भाग आहेत, जे फेसबुकचे माजी कर्मचारी असून त्यांनी कंपनी आणि तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल अमेरिकेच्या सिनेटसमोर साक्ष दिली होती.