। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात भारतीय चलनात बनावट नोटा उतरवणाऱ्या टोळीचा गोरेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत रायगड पोलिसांनी तिघांना अटक केली असून, मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश आले. माणगाव टेमपाले येथील मुफस्सिर ऊर्फ मिनी अब्दुल राशिद खानदेशीच्या घरात बनावट नोटा आढळून आल्या. त्याला मदत करणारा म्हसळा तालुक्यातील निगडी-पाबरे येथील सुनील मोरेला शनिवारी (दि. 20) अटक करण्यात आली आहे. गुरुवार दि. 25 पर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, तर फरारी मेहबुब उलडेला सोमवारी रात्री दिघी येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गोरेगाव परिसरात बनावट नोटा चलनात आणल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या कारवाईत आरोपीच्या घरातील कपाटात बनावट नोटा सापडल्या आहेत. या नोटा कशा आल्या याचा तपास पोलीस घेत आहेत. या टोळीने वीस, पन्नास आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात वापरल्याचे तपासात उघड झाले आहे. हुबेहुब खऱ्या नोटांसारख्या दिसणाऱ्या या नोटांमुळे सामान्य नागरिकांची दिशाभूल झाली, पण काही सजग नागरिकांमुळे हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला.
तपास यंत्रणेवर राजकीय दबाव
मुख्य आरोपी मुफस्सिर ऊर्फ मिनी अब्दुल राशिद खानदेशीकडे बनावट नोटा सापडल्या. त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने विविध गावांमध्ये बनावट नोटा पुरवण्याचा प्रयत्न केला होता. रविवारी (दि. 21) उशिरा याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, मात्र नोटा वटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अन्य दोन साथीदारांना अद्याप अटक झालेली नाही. या कारवाईत अटक आरोपींमध्ये मुफस्सिर ऊर्फ मिनी अब्दुल राशिद खानदेशी रा. टेमपाले, ता. माणगाव, सुनील बाळाराम मोरे रा. निगडी, म्हसळा, मेहबूब उलडे रा. बोर्लीपंचतन, ता. श्रीवर्धन येथील असल्याने रायगड पोलिसांवर राजकीय दबाव आल्याचे बोलले जात आहे.
बाजारात बनावट चलनी नोटा
या परिसरात बनावट नोटा असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र या नोटा कोणाच्या माध्यमातून चलनात आणल्या जात आहेत, याचा शोध लागत नव्हता. अखेर गोरेगाव पोलिसांच्या छाप्यात आरोपींकडून 3 लाख 80 हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, तर बाजारात असलेल्या नोटांचा तपास पोलीस घेत आहेत. गोरेगाव पोलिस ठाणे, गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी प्रकरणाचा व्यापक शोध करत आहे. तसेच नागरिकांनी संशयास्पद नोटा आढळल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणावे, असे आवाहन केले आहे.
पोलिसांच्या छाप्यात मुख्य आरोपीच्या घराच्या कपाटात काही नोटा आढळून आल्या. बॅंकेतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपासणी केल्यावर नोटा नकली असल्याचे आढळून आले. या प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
विजय सुर्वे,
पोलीस निरीक्षक, गोरेगाव
