लाखोंचे दागिने नेले लुबाडून
| पनवेल | वार्ताहर |
पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी कामोठे येथील एका ज्येष्ठ नागरिकांचे सोन्याचे दागिने लुबाडून नेल्याचे समोर आले आहे.
कामोठे येथे घडलेल्या घटनेत दोघा तोतया पोलिसांनी मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन चौगुले (64) यांचे 2 लाख 70 हजारांचे दागिने लुबाडून नेले. चौगुले हे सेक्टर-32 येथील कब्रस्थानच्या रस्त्यावरून फिरण्यासाठी गेले होते. त्याचवेळी रेनकोट घालून आलेल्या एका भामट्याने त्यांना पोलीस असल्याचे सांगितले. तसेच त्यांना पोलीस कार्ड दाखवून या परिसरात गुन्हे होत असल्यामुळे त्यांना या परिसरात तपासणीसाठी नेमल्याचे सांगितले. त्यानंतर चौगुले यांना त्यांच्या जवळचे दागिने काढून दाखवण्यास सांगितले. मात्र, चौगुले यांनी त्यास नकार दिला. मात्र त्याने जबरदस्तीने दागिने काढण्यास सांगितले व शेजारी दुचाकी घेऊन थांबलेल्या साथीदाराला बोलावून ते तपासण्यास सांगितले. त्यानंतर चौगुले यांनी त्यांचे दागिने परत मागितले असता, त्यांनी चौगुले यांना ढकलून दिले व दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी चौगुले यांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.






