तोतया लोकसेवक पोलिसांच्या जाळ्यात

| अलिबाग | प्रतिनिधी |

भारत सरकारचे महाराष्ट्र डिव्हीजन ऑफिसर असल्याची बतावणी करणारा तोतया लोकसेवक पोलिसांच्या जाळ्यात सापडला. बुधवारी (दि. 24) दुपारी ही घटना पोलीस अधीक्षक कार्यालयातील समाधान कक्षात घडली. एका पोलिसाची बदली थांबविण्याच्या कामासाठी तो आल्याची माहिती समोर येत आहे.

लक्ष्मण दगडू गायकवाड असे या आरोपीचे नाव आहे. खालापूर तालुक्यातील जांभीवली चौक येथील तो रहिवासी आहे. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण पोलीस अधीक्षक कार्यालयातील समाधान कक्षामध्ये आला होता. रायगड पोलीस दलातील कर्जत पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार वसंत वराडे यांची माथेरान किंवा खालापूरमध्ये बदली करण्याची विनंती करण्याच्या निमित्ताने तो पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना भेटण्यासाठी आला होता. समाधान कक्षात आल्यावर त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने भारत सरकारचे ओळखपत्र व नियुक्तीपत्र दाखविले. त्या ओळख पत्राची तपासणी केली असता, अशा प्रकारचा कोणीही डिव्हीजन अधिकारी नसल्याची खात्री पोलिसांनी पटली. तोतया लोकसेवक असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्याच्याविरोधात पोलीस शिपाई प्रणाली पाटील यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे करीत आहेत.

Exit mobile version