दोन वर्षांनंतरही तिसेतील संरक्षण भिंतीला मुहूर्त मिळेना
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यात दरडप्रवण घोषित करण्यात आलेल्या तिसे गावातील ग्रामस्थ गेल्या दोन वर्षांपासून भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या 25 ते 30 कुटुंबांना दरडीचा धोका असून, पावसाचा जोर वाढला की जीवित आणि घरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पाहणी करून संरक्षण भिंत उभारण्याचे आश्वासन दिले; मात्र दोन वर्षांनंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
गतवर्षी मुसळधार पावसात तिसे येथे दरड कोसळल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे, आमदार अनिकेत तटकरे, तहसीलदार किशोर देशमुख, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्यासह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकानेही धोकादायक भागाची पाहणी केली होती. त्यावेळी संरक्षण भिंत उभारण्याचे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले. मात्र, अद्याप काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. ‘दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना होण्याआधीच संरक्षण भिंत उभारावी,’ अशी मागणी ग्रामस्थ उमेश पांडुरंग शिगवण यांनी केली. उमाजी गणपत गोरीवले, सुनील पांडुरंग शिगवण यांच्यासह अनेक कुटुंबांची घरे धोकादायक परिसरात आहेत. प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी सांगितले की, संरक्षण भिंतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू केले जाईल. पाहणी झाली, प्रस्ताव गेला, आश्वासनही मिळाले; आता प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार? असा सवाल तिसे ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यातील धोका लक्षात घेता प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन संरक्षण भिंतीचे काम सुरू करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.







