। मुंबई । प्रतिनिधी ।
मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी शुक्रवारी (दि. 04) सायंकाळी निधन झाले. विलास उजवणे यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
डॉ. विलास उजवणे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने अमीट छाप सोडली होती. त्यांच्या सहजसुंदर अभिनय शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. सकारात्मक भूमिकांसह त्यांच्या खलनायकी भूमिकाही विशेष गाजल्या होत्या. ‘वादळवाट’, ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून ते घराघरांत पोहोचले. साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत असतानाच विलास उजवणे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला होता. त्यातच त्यांना कावीळचीदेखील लागण झाली होती. मात्र, मोठ्या धीराने त्यांनी या गंभीर आजाराशी लढा दिला आणि मनोरंजनविश्वात पुन्हा कमबॅकसुद्धा केले होते. ‘कुलस्वामिनी’, ‘26 नोव्हेंबर’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.