। मुंबई । प्रतिनिधी ।
बॉलीवूड आणि टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता सतीश शाह यांचे निधन झाले आहे. किडनी फेल झाल्यामुळे त्यांना शनिवारी (दि.25) दुपारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला असून चित्रपट आणि टीव्ही उद्योगातील कलाकार शोक व्यक्त करत आहेत.
सतिश शाह यांनी 1970 मध्ये ‘भगवान परशुराम’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, पण त्यांना खरी ओळख अरविंद देसाई यांच्या ‘अजीब दास्तान’ चित्रपटाद्वारे मिळाली. सतिश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका केल्या, पण ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मध्ये इंद्रवर्धन साराभाई, ज्याला इंदू म्हणूनही ओळखलं जातं, या भूमिकेने त्यांना घराघरात लोकप्रिय केलं. या कॉमेडी शोमध्ये त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयानेप्रेक्षकांचं मन जिंकलं. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ हा एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप कॉमेडी शो होता आणि आजही, त्यातील व्हिडिओ क्लिप्स दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतात.
सतीश शहा बऱ्याच काळापासून किडनीच्या संबंधित आजाराने ग्रस्त होते. तसेच त्यांची किडनी प्रत्यारोपण झाल्याचं बोललं जातं आहे. त्यातूनच त्यांना इन्फेक्शन झाले होते. तर काहींच्या मते त्यांची किडनीच निकामी झाल्यामुळे त्यांचा त्रास वाढला आणि त्यांना दादरमधील हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मैं हूं ना, कल हो ना हो, फना, ओम शांति ओम, हम आपके हैं कौन आणि जाने भी दो यारों सारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ चरित्र आणि विनोदी अभिनेते सतीश शाह यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.





