। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील सापे-वामने रेल्वे स्थानक पुनर्निर्माणविकासनंतर प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. उंचीचे प्लॅटफॉर्म नसल्यामुळे प्रवाशांना चढणे-उतरणे धोकादायक झाले आहे. या प्रमुख समस्येसह स्थानकाच्या विकासासाठी सापे-वामने-नडगाव बहुविकासीय सामाजिक संस्था, महाड यांच्या पदाधिकारी यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.भरत गोगावले यांना निवेदन दिले असता केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना भेटून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन दिले आहे.
सापे-वामने रेल्वे स्टेशनच्या समस्यांबाबत निवेदन देताना संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस अनंत जाधव, सल्लागार नामदेव घाणेकर, माजी सरपंच प्रवीण साळवी आणि अनिल किजबिले आदी संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
निवेदनात प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्मची उंची आणि लांबी वाढविणे, मुख्य रस्ता ते स्थानक रस्ता तयार करणे तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि गुरांच्या सुरक्षित हालचालीसाठी भुयारी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, भरत गोगावले यांनी समस्येची दखल घेत लवकरात लवकर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांजवळ प्रत्यक्ष भेट घेऊन उपरोक्त चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.







