चाकरमान्यांच्या खिशाला कात्री!

विशेष रेल्वे गाड्यांसाठी नियमितपेक्षा जवळपास दुप्पट भाडे

| मुंबई | प्रतिनिधी |

गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूरसह विविध शहरांत राहणारे कोकणातील चाकरमानी आपल्या गावच्या वाटेला लागण्याची तयारी करतात. वर्षभर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली जाते, त्या बाप्पाच्या दर्शनासाठी घराकडे निघालेल्या या भाविकांच्या उत्साहावर मात्र रेल्वेचे वाढीव भाडे आणि विलंबाचे सावट पडले आहे. आराध्य दैवत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांकडून भरमसाठ भाडे आकारायचे आणि त्यानंतरही त्यांना वेळेवर सेवा द्यायची नाही, ही व्यवस्था नेमकी कोणासाठी? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडल्या जातात. यंदा मध्य रेल्वेने 246, तर पश्चिम रेल्वेने 60 विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत. मात्र, प्रवासी संघटनांनी तब्बल 400 विशेष फेऱ्यांची मागणी केली आहे. त्यामुळे उपलब्ध गाड्यांची संख्या आणि प्रवाशांची प्रचंड मागणी यामध्ये मोठी तफावत असल्याचे चित्र आहे.

विशेष गाड्यांच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. मुंबई ते खेड मार्गाचे उदाहरण घेतल्यास नियमित गाडीच्या शयनयानाचे भाडे 205 रुपये आहे. याच मार्गासाठी विशेष गाडीच्या शयनयानाचे भाडे तब्बल 400 रुपये आकारले जाणार आहे. एसी तृतीय श्रेणीचे नियमित भाडे 520 रुपये असताना विशेष गाडीसाठी 1 हजार 70 रुपये, तर एसी द्वितीय श्रेणीसाठी नियमित 725 रुपयांऐवजी तब्बल 1 हजार 470 रुपये मोजावे लागणार आहेत.

वाढीव भाड्यासोबत किमान 500 किलोमीटरची अट
रेल्वे बोर्डाने 2015 मध्ये विशेष गाड्यांसाठी तयार केलेल्या नियमांनुसार वाढीव भाड्याची तरतूद आहे. त्यात प्रत्यक्ष प्रवास 500 किलोमीटरपेक्षा कमी असला तरी किमान 500 किलोमीटरचे भाडे आकारले जाते. त्यामुळे 200 ते 300 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या नियमाचा मोठा फटका बसतो.
विशेष गाड्यांसाठी आधीच वाढीव भाडे आकारले जात असताना किमान अंतराची अटही लावणे अन्यायकारक असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही अट रद्द करण्याची मागणी होत आहे.
Exit mobile version