जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सुरक्षेसाठी सज्ज; कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडेकोट पहारा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
पाच दिवसांच्या पाहुणचारानंतर गणरायासह गौराईला जड अंतःकरणाने गुरुवारी (दि. 12) भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ होणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…’ असा जयघोष करीत जिल्ह्यातील तलाव, नदी, समुद्रात तसेच कृत्रिम तलावांमध्ये 60 हजार 855 मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. मिरवणूक व विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगड पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवला जाणार आहे.
दीड दिवसांच्या बाप्पानंतर पाच दिवसांच्या बाप्पाचे गौराईसोबत विसर्जन गुरुवारी केले जाणार आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास मिरवणूक निघणार आहे. गुलालाची उधळण करीत, भजन, गाणी गात तसेच डिजेच्या तालावर नाचत बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्याची तयारी जोरात सुरु आहे. मिरवणुकीवर पावसाचे विरजण पडू नये यासाठीदेखील अनेकांनी तयार केली आहे.
जिल्ह्यात पाच दिवसांच्या 55 हजार 923 गणेशमूर्ती असून, 54 हजार 923 खासगी व 79 सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे. तसेच 15 हजार 853 गौराईंची मूर्ती, मुखवटे आहेत. गुरुवारी सायंकाळी काढण्यात येणार्या मिरवणुका मशीद, दर्गा, मोहल्ला अशा एकूण 16 ठिकाणांहून जाणार आहेत. जिल्हा पोलीस दलामार्फत राज्य राखीव पोलीस दल, आरसीपी प्लाटून दल तैनात करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात स्ट्रायकींग फोर्स असणार आहेत. त्यामध्ये 50 पोलीस अंमलदारांची नेमणूक केली आहे. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचार्यांबरोबरच पाचशे होमगार्डदेखील पोलिसांच्या मदतीला असणार आहेत. गणेशोत्सव आनंदात साजरा करता यावा, गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात आले असून, हे दल जिल्ह्यात दाखल झाले आहे.
समुद्रकिनारी विविध सोयी सुविधा
इको फ्रेंडली गणपती उत्सवाच्या निमित्ताने कृत्रिम तलाव समुद्रकिनारी उभारण्यात आला आहे. दीड दिवसांच्या 25 हून अधिक गणेशमूर्तींचे तलावात विसर्जन केले. पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गुरुवारी होणार आहे. समुद्रकिनार्यांपासून शंभर मीटर अंतरापर्यंत विद्युत सेवेची व्यवस्था केली आहे. कर्मचार्यांसाठी बैठक व्यवस्था, स्वागत कक्ष, मदत कक्ष, आरती कक्ष, वारंवार सूचना देणारे कक्ष, निर्माल्य संकलन केंद्र, अशा अनेक सोयी सुविधा केल्या असल्याची माहिती अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी दिली.