जिल्हा प्रशासन लागले कामाला; जिल्हाधिकार्यांनी घेतली नोडल अधिकार्यांची बैठक
| रायगड | खास प्रतिनिधी |
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असतानाच आता जिल्हा प्रशासनदेखील तयारीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नोडल अधिकार्यांची बुधवारी (दि. 11) बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी संबंधितांना विविध सूचना केल्या.
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांसह 23 समित्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणूक कालावधीमध्ये कामकाज करण्यासाठी जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्य नियंत्रण कक्ष, वाहतूक व्यवस्थापन, आदर्श आचार संहिता, बॅलेट पेपर आणि पोस्टल बॅलेट पेपर व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, प्रसार माध्यम आणि संदेशवहन, निवडणूक निरीक्षक, प्रशिक्षण आणि जनजागृती, मतदान केंद्र, मतदान केंद्रावरील किमान मूलभूत सुविधा, दिव्यांग मतदार, स्वीप मोहीम शहरी व ग्रामीण भाग या निवडणूकविषयक कामकाजासाठी नोडल अधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
मतदान कर्मचार्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीचे जास्तीत जास्त प्रशिक्षण देण्याबाबत निर्देश त्यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याची खात्री करा, शांततापूर्ण निवडणुकांसाठी सुरक्षा योजना तयार करा, पोस्टल मतदानासाठी पात्र व्यक्तींना पोस्टल मतदानाबाबतची माहिती मुदतीत देण्यात यावी, कोणत्या मतदारांना टपाल मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे हेदेखील बीएलओला माहीत असावे, सोशल मीडियावर विशेष नजर ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकार्यांचे निर्देश
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. निवडणुकीवर प्रभाव टाकणारी सामुग्री रोखण्यासाठी जिल्हा आणि राज्याच्या सीमेवर चौक्या उभारण्यात याव्यात, फ्लाइंग स्क्वॉड आणि एसएसटीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, निवडणूक संबंधित तक्रारींसाठी तयार करण्यात आलेल्या सी-व्हिजिल मोबाईल अॅपवर लक्ष ठेवावे, तात्काळ निराकरण करावे, मतदार जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवावी, आदिवासी वाड्या-वस्त्या या ठिकाणी तसेच मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या भागाकडे विशेष लक्ष द्यावे, असेही निर्देश जावळे यांनी यावेळी दिले.
प्रात्यक्षिक केंद्राचे उद्घाटन
विधानसभा निवडणूक 2024 करिता ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जावळे यांच्या हस्ते प्रात्यक्षिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.