जेएसडब्ल्यूविरोधात शेतकरी आक्रमक

उच्च दाबाच्या वीजवाहिनीला विरोध कायम

| नागोठणे | वार्ताहर |

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कानसई नागोठणे ते डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीत 400/220 के.व्ही. ही उच्च वीज दाब वाहिनी टाकण्याच्या कामात कंपनी प्रशासन व संबंधित ठेकेदार यांची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे या उच्च वीज दाब वाहिनी विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून एकतर आमची जमीन शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसारच्या दराने सरसकट संपादित करावी अथवा बाधित शेतकर्‍यांच्या एका वारसाला कंपनीत नोकरी द्यावी, अशी मागणी बाधित शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.

ज्या शेतकर्‍यांच्या जागेतून ही उच्च वीज दाबाची वाहिनी जाणार आहे, त्या शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल होणार आहेत. त्यामुळे अशी जमीन भविष्यात कुणीही विकत घेणार नाही अथवा संबंधित शेतकरी या जागेचा विकासही करु शकणार नाही. त्यामुळेच कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पळस ग्रामपंचायत हद्दीतील पळस, शेतपळस, बाहेरशिव, वाघळी व निडी येथील शेतकर्‍यांनी नुकतीच निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

यावेळी स्थानिक शेतकरी ज्ञानेश्‍वर शिर्के, चंद्रकांत दुर्गावले, शशिकांत शिर्के, पळस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वाघळी येथील रामचंद्र कदम, शेतपळस येथील सदस्य सतीश डाकी, अजित शिर्के, हरिश्‍चंद्र मढवी, शिवराम कदम, पळस ग्रा.पं.सदस्य सतिश डाकी, विजय विचारे, लक्ष्मण भालेकर, गणेश म्हात्रे आदींसह शेतकरी यावेळी उपस्थित होते.

जेएसडब्ल्यू कंपनीच्या या 30 किलोमीटर लांबीच्या वीजवाहिनीचे सर्वेक्षण करताना शेतकर्‍यांना विश्‍वासात घेतले नाही. या उच्चदाब वाहिनीपासून दोन्ही बाजूकडील मोठ्या प्रमाणातील शेती बाधित होऊन शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम व वीज वाहिन्या टाकण्याचे काम जेएसडब्ल्यू कंपनीने दुसर्‍या एका खासगी कंत्राटदार कंपनीला दिले आहे. असे असतानाच ज्या शेतकर्‍यांच्या शेतातून ही उच्चदाब वीजवाहिनी जाणार आहे, त्या शेतकर्‍यांना फसवणुकीने कमी रकमेचे धनादेश देण्याचे काम ठेकेदाराने केले आहे. बाधित शेतकर्‍यांना पटविण्यासाठी गावातील पुढारी असलेल्या एजंटना ठेकेदाराकडून नेमण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकर्‍यांत संतापाची लाट उसळली असून, या प्रकाराला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Exit mobile version